महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

भारताच्या पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल,१८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात.

प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्यलढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी समाजासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला.२९ ऑगस्ट १९४७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जवळजवळ दोन वर्षे अकरा महिने आणि सात दिवसांच्या अथक परिश्रमाने भारतीय संविधान सादर करण्यात आले. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला.‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’असा गुरुमंत्र त्यांनी दिला.

असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्याया महामानवाच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी राज्यातील सर्व विद्यार्थी, छात्राध्यापक, नवीन पिढीतील तरुणाई यांना भारतरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थी, छात्राध्यापक, आणि शिक्षक यांच्यासाठीविविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

.बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाचा अतिशय व्यासंग होता. विद्यार्थीदशेत त्यांना संस्कृतचे अध्ययन करता आले नाही. पुढे ते मुद्दाम चिकाटीने संस्कृत शिकले. ग्रंथांशिवाय आपण जगूच शकत नाही, असे त्यांचे मत होते. मृत्यूसमयी त्यांच्या ग्रंथालयात सु. २५,००० दुर्मिळ ग्रंथ होते.अर्थशास्त्रात उच्चविद्याविभूषित असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र अशा अनेक विषयांवर संशोधने केलेली आहेत . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपूल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली ग्रंथ-पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. डॉ. आंबेडकराना प्रचंड वाचन वेड होतं. ते जगातील सर्वश्रेष्ठ वाचकांपैकी एक होते. इंग्लडमध्ये शिकत असताना तेथील ब्रिटिश म्युझियममध्ये वाचण्यासाठी ते जात असत. या ठिकाणी घडलेला सँडविचचा किस्सा सर्वपरिचित आहेच. तिथे दुपारी काहीही न खाता ते 12 तास वाचन करीत. जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल,हे त्यांचे विचार आजही दिशादर्शक आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार सर्व विद्यार्थी, छात्राध्यापक यांच्यामध्ये रुजावेत, यासाठी १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शालेय स्तरावर ऐच्छिक स्वरूपात विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिनांक १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळा आणि अध्यापक विद्यालयामध्ये खालील विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. यामध्ये विद्यार्थी,छात्राध्यापक, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा.

शालेय जीवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सलग १८ -१८ तास अभ्यास करत असत. हा गुण शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रतिबिंबित व्हावा यासाठी इयत्ता ७ वी ते इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळांना उपरोक्त उपक्रमांसोबत शिक्षकांच्या मार्गदर्शन व उपस्थितीखाली विद्यार्थ्यांसाठी किमान सात ते आठ तास सलग अभ्यास स्पर्धा देखील आयोजित करता येईल. तसेच शालेय स्तरावर ऐच्छिक स्वरूपात अभ्यास महोत्सव किंवा पर्यवेक्षीत अभ्यास यासारखे शैक्षणिक उपक्रम यांचे सुद्धा आयोजन करता येईल. मात्र याचे आयोजन करत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची योग्य ती खबरदारी घेण्याची दक्षता घेण्यात यावी.

उपरोक्तप्रमाणे विद्यार्थी, छात्राध्यापक व शिक्षक यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून सादरीकरणाचा दोन ते तीन मिनिटांचा सुस्पष्ट व्हिडिओ फोटो व इतर साहित्य समाजसंपर्क माध्यमावर (फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम) #muknayak या HASHTAG (#) चा वापर करून अपलोड करण्यात यावे. व त्या पोस्टची लिंक https://scertmaha.ac.in/competitions/ इथे देण्यात यावी.