भारत सरकारने ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत संपूर्ण देशात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि केंद्रीय शालेय शिक्षण मंत्रालय यांचे मार्फत ‘शालेय आरोग्य कार्यक्रम’ (School Health & Wellness Programme) सुरु केला आहे. शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासकीय अनुदानित इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळांमध्ये सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक सवयी, जाणीवा या विषयी जनजागृती व जबाबदारी निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
महाराष्ट्र राज्यातील आकांक्षित चार जिल्हे नंदुरबार, गडचिरोली, वाशिम व धाराशिव व आरोग्य विभागामार्फत कार्यान्वित केलेल्या राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत पाच जिल्हे धुळे, जळगाव, बीड, नांदेड व छत्रपती संभाजीनगर अशा एकूण ९ जिल्ह्यांमध्ये प्रथम टप्पा म्हणून कार्यक्रमाची अंमलबजावणी ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून झाली आहे.
सन २०२६-२७ मध्ये राज्यातील ठाणे, जालना, पालघर, नाशिक, यवतमाळ, हिंगोली, अहिल्यानगर, रायगड, परभणी, लातूर, वर्धा अशा एकूण ११ जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमाची अंमलबजावणी ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुरु करण्यात येत आहे.
उपरोक्त जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित प्रकारच्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षक असे एकूण तीन व्यक्तींना आरोग्यवर्धिनी दूत SCHOOL HEALTH AND WELLNESS AMBASSADOR म्हणून online प्रशिक्षण या कालावधीत सकाळी १०.१५ ते दुपारी ०४.०० पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक व दोन शिक्षक यांनी प्रस्तुत पोर्टल वरील मेनू pre-test, training session, schedule यावर शाळा UDISE क्रमांकाद्वारे लॉगीन करून वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित रहायचे आहे. प्रशिक्षणार्थींनी सोबतच्या मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करून पालन करावे.